नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू ढोमने यांच्या घरामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सर्पमित्रांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून सर्व नागांना सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडण्यात आले.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि वन्यजीव मानवी वस्तीकडे वळण्याच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळील नेरला गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राजू ढोमने यांच्या घरामध्ये अचानक सापांचा वावर दिसून आल्याने कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. घरामध्ये तपासणी केली असता तब्बल 40 नागांची पिल्ले आणि दोन मोठे नाग आढळून आले. एवढ्या मोठ्या संख्येने नाग आढळल्याने परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते.
घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र रतन कुंभरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरी आणि कौशल्याने त्यांनी सर्व नागांची पिल्ले व नाग कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडले. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत सर्व सापांना रामटेक वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.