नागपूर : लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एका महत्त्वपूर्ण खटल्यात विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ श्री. एस. एच. ग्वालानी यांनी नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३२ येथील सफाई निरीक्षक खिलावन गणू राम लांजेवार याला शिक्षा सुनावली.
ही घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. एक सफाई कर्मचारी कामावर गैरहजर होती. तिचा पगार काढण्यासाठी आरोपीने चार हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार महिलेला लाच रक्कम द्यायची नसल्यामुळे तिने २०१५ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीने चार हजारांपैकी तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली होती.
सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास झाल्यानंतर हा खटला शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी चालवला. शासनाच्या वतीने या खटल्यात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच साक्षीदार, तपास अधिकारी आणि सक्षम अधिकारी या सर्वांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश श्री. एस. एच. ग्वालानी यांनी आरोपी खिलावन लांजेवार याला कलम ७ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास) तसेच कलम १३ (१) (ड) लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये चार वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास) अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी कामगिरी केली.