नागपूर

Nagpur News : नागपूर हादरले! प्रसूतीसाठी अघोरी 'बळा'चा वापर; शासकीय रुग्णालयात नवजात अर्भकाचा बळी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीतील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय डागा रुग्णालयातून माणुसकीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या छातीवर बसून, गुडघ्यांच्या बळाचा वापर करत प्रसूती करण्याचा अघोरी प्रयत्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अमानवीय प्रकारात संबंधित महिलेला आपले बाळ गमवावे लागले असून, या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.

काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, दीपलता बनोटे या महिलेला प्रसूती कळा येत असल्याने डागा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीपलता यांच्या पतीच्या दाव्यानुसार, त्यांना रुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर तब्बल नऊ तास तडफडत ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रसूती कक्षात नेण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या एका 'मावशी'ने (परिचारिका किंवा मदतनीस) दीपलता यांच्या छातीवर बसून गुडघ्यांनी दाब देऊन प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत वेदनादायी आणि वैद्यकीय शास्त्राला धरून नसलेला होता, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

रिपोर्ट्स नॉर्मल असूनही बाळ मृत

महिलेच्या पतीने संताप व्यक्त करताना सांगितले की, दीपलता यांचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स आणि तपासण्या नॉर्मल होत्या. असे असतानाही केवळ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि अघोरी पद्धतीमुळे बाळ मृत जन्माला आले. "नऊ तास तडफडत ठेवल्यानंतर माझ्या पत्नीसोबत जो प्रकार घडला, तो कोणत्याही अमानुष कृत्यापेक्षा कमी नाही," अशा शब्दांत पीडितेच्या पतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

रुग्णालय अधीक्षकांचा दावा आणि नकार

या प्रकरणावर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप मडावी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कुटुंबाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "रुग्णालयात अशी घटना घडूच शकत नाही," असा दावा डॉ. मडावी यांनी केला आहे. रुग्णालयाकडून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी नातेवाईकांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नगरसेवकांचा गंभीर आरोप

या प्रकरणाची दखल स्थानिक नगरसेवक वसीम खान यांनी घेतली आहे. "शासकीय रुग्णालय असूनही डागामध्ये असे प्रकार नियमित घडत आहेत. गरिबांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रुग्णालयावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही," असा आरोप त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT