नागपूर - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतरच्या आज झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस एकवटली दिसली. ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मात्र, दादांनी शिकवलेला संघर्षाचा वारसा आणि त्यांनी दिलेली जनसेवेची जबाबदारी आता अधिक जोमाने पुढे नेण्याची वेळ आली आहे, असा निर्धार आज नागपूर येथे आयोजित विशेष बैठकीत व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रूपालीताई चाकणकर या दादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना या कठीण काळात खंबीर राहण्याचे आवाहन केले.
बैठकीचे प्रास्ताविक आणि संचालन शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी केले. दादांनी आपल्याला कधीही रडत बसायला शिकवले नाही. आज आपल्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. सुनेत्रा वहिनी पवार यांनी ज्या संयमाने आणि खंबीरपणे दादांच्या प्रत्येक संघर्षात साथ दिली, तोच आदर्श ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे. वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.दादांचे जाणे हे केवळ पक्षाचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान आहे यावर भर दिला गेला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, श्रीकांत शिवणकर , सुनीता येरणे,करिष्मा चुटे, नरेश अरसडे,तानाजी वनवे, नूतन रेवतकर,रूपाली पिचकाटे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.