नागपूर -हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ च्या सातव्या दिवशी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात संस्कार भारती, नागपूरच्या एक हजारावर कलाकारांनी भारताच्या विविध राज्यांच्या परंपरा, लोककला आणि राष्ट्रीय सांस्कृतिक वैभव उजागर करणारा ‘मिट्टी के रंग : भारताची लोकसंस्कृती की संगीत नृत्यमय गाथा’ हा देखणा कार्यक्रम सादर केला.
गायक, वादक आणि नृत्यकलावंतांनी हा कलाविष्कार सादर केला. सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येयगीताने झाली. उत्तराखंड प्रांतातील ‘नमो नमो जी शंकरा’ व ‘तुम्हे दिल मी बसाया’ ही गीतरचना वातावरणात भक्तिभाव निर्माण करणारी ठरली. आसामच्या भूमीतल्या बिहू नृत्याची उत्साहवर्धक प्रस्तुती, राजस्थानच्या परंपरेतील ‘म्हारो हेलो सांभाळो’ या सुरांनी सजलेला घुमर, ओडिशाचा संबलपुरी दारा लोग, बंगालच्या ‘फागुनेर कोमालो सुंदरी’ची मृदू लय, कर्नाटकचा कदुलू, ब्रजभूमीतील ‘होरी खेले रघुवीरा’चा फागोत्सवातील आनंद, पंजाबच्या गिद्ध्याची झंकार आणि महाराष्ट्राचा ढोलताशांचा गजर—अशा लोककलेच्या विविध रूपांनी पटांगण दुमदुमले. ‘वेसवीची पारू’, ‘लटपट’, ‘गडावर गड संबळ’ यांसारख्या महाराष्ट्रातील नृत्य-सादरीकरणांनीही प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचा समारोप भारताच्या एकतेचे प्रतीक ठरलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताने झाला.
संयोजन गजानन रानडे, अमर कुलकर्णी आणि आनंद मास्टे यांनी केले. सहसंयोजक म्हणून अवंती काटे, श्रीकांत धबडगावकर आणि कुणाल आनंदम यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. संगीत मोरेश्वर दशसहस्त्र आणि अथर्व शेष यांचे होते. संहिता लेखन आशुतोष अडोणी यांनी केले, तर निवेदन श्रद्धा भारद्वाज आणि सनी प्रसाद यांचे होते. सुनील हमदापूरे यांनी नेपथ्य, ध्वनी व प्रकाशयोजना संदिप बारस्कर यांनी प्रभावीपणे हाताळली. निर्मिती सहाय्यात डॉ. मृणालिनी दस्तुरे, मुकुल मुळे, प्रसाद पोफळी, नीरज अडबे, प्रदीप मारोटकर, शंतनु हरिदास, आसावरी गोसावी, अक्षय वाघ, संजय खनगई आणि स्मिता खनगई यांचा मोलाचा वाटा होता.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष कांचनताई गडकरी, उद्योजक सत्यनारायण नुवाल, हल्दीरामचे शिवकिशन अग्रवाल, निकोचे संचालक रमेश जयस्वाल, उद्योगपती पद्मेश गुप्ता, तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे, श्रीमत राजे मुधोजी भोसले, यशपाल आर्य, संस्कार भारतीचे आशुतोष अडोणी, चंद्रकांत घरोटे या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. तत्पूर्वी, गजवक्र ढोलताशा पथकाच्या वादनाने वातावरण निर्मिती केली.
मेहंदी परंपरेला युनोची मान्यता - नितीन गडकरी
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी शारदोत्सवात एक लाखाहून अधिक महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली. यातून 6 हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. आपल्या या परंपरेला युनोची मान्यता मिळाली असल्याची शुभवार्ता नितीन गडकरी यांनी दिली.