राजेंद्र उट्टलवार
नागपूर: नागपूरच्या माजी महापौर, आदिवासी नेत्या मायाताई चिंतामण इवनाते या भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार असणार आहेत. अलीकडेच झालेल्या मनपा निवडणुकीत त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मनपा अग्निशमन समितीच्या सभापती म्हणूनही त्यांना नुकतीच संधी मिळाली. आता त्यांनी थेट दिल्लीच्या दिशेने आगेकूच केली आहे.
यापूर्वी राष्ट्रीय आदिवासी जनजाती आयोग सदस्य ,भाजपच्या राष्ट्रीय आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून त्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती आहे. यामुळेच भाजपत अनपेक्षित पण कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अनेकांना हा सुखद धक्का म्हणता येईल. आज अर्ज भरण्यासाठी पक्षनेतृत्वाने त्यांना तातडीने मुंबईत बोलावले.
रिपाइं नेते रामदास आठवले, भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, मायाताई इवनाते, रामराव वडकुते यांच्या नावाची राज्यसभेचे भाजपचे उमेदवार म्हणून दुपारी घोषणाही झाली असल्याने त्या भाजपच्या खासदार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. यानिमित्ताने आदिवासी समाजाला पक्षाने संधी दिली असून यापूर्वी सामाजिकदृष्ट्या धनगर समाजाचे नेते पद्मश्री डॉ विकास महात्मे यांना नागपुरातून राज्यसभेची संधी मिळाली होती.