नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सापळा रचून सुमारे २ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली आहे.
१२२६२ हावडा-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमधून दोन जण मोठ्या प्रमाणात सोने घेऊन जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्याआधारे गुरुवारी डीआरआयच्या पथकाने आरपीएफच्या मदतीने हा यशस्वी सापळा रचला आणि यामधील दोघा आरोपींना अटक केली.
नागपूर-भंडारा दरम्यान रेल्वेत पथकाने संशयित दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता त्यात १ कोटी ९६ लाख ३४ हजार रुपये किमतीचे सोने आढळून आले. आता अर्थातच ते हे सोने कुठून आणण्यात आले आणि कोणाकडे पोहोचविण्यात येणार होते, याचा तपास आता डीआरआयचे पथक करीत आहे.