Fake Caste Certificate Pudhari
नागपूर

Nagpur News |अखेर काँग्रेस आमदारांच्या कॉलेजमधील प्रवेश रद्द!

बनावट जात वैधता प्रकरण, भाजपचा पाठपुरावाः ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, ११ जणांविरुद्ध गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर :  काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्या शिक्षण समूहातील गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील बनावट अनुसूचित जमाती (एसटी) जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

 आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, बनावट जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द करण्यात आले असून, या रॅकेटमधील दोन सहाय्यक प्राध्यापकांसह ११ जणांविरुद्ध पाचगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 

 भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाने १० एप्रिल रोजी  केलेल्या चौकशीच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सर्वप्रथम या गंभीर विषयाकडे लक्ष घालून अनुसूचित जमाती आघाडीला सूचना केल्या व त्यानुसार संबंधित कॉलेज प्रशासन व दोषींवर कार्यवाहीची मागणी केली होती. याराज्यातील इतर खासगी शैक्षणिक संस्थांमध्येही अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतले गेले असण्याची शक्यता व्यक्त करत सर्व संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती.

 अनुसूचित जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष आकाश मडावी यांच्या नेतृत्वात  सह-आयुक्त, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात गोविंदराव वंजारी कॉलेजमधील बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. निवेदनात या प्रकरणात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर काही प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

दरम्यान, विधानसभेत उपस्थित केलेल्या  आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  यापुढे कोणत्याही शिक्षण संस्थेने जात वैधता प्रमाणपत्राची खातरजमा केल्याशिवाय आरक्षित जागांवर प्रवेश देऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.  या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून या रॅकेटमागील सर्व सूत्रधारांना शासन व्हावे,  अशी मागणी आकाश मडावी शहर अध्यक्ष, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा नागपूर महानगर महामंत्री रोहित कुमरे,ललित मडावी,मौसमी परतेकी,अनिकेत कुमरे,सागर इवनाते,अश्विन गेडाम,लतीकेश परतेकी,मनीष सयाम व करुणा आत्राम यांच्या वतीने  करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT