नागपूर - भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून ते भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या विचारांना आकार दिला जातो. चारित्र्याची जडणघडण होते. चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केले.
रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात 29 व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उपराष्ट्रपती सी . पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसद परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी आद्य सरसंघचालकाना त्यांनी अभिवादन केले.
उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, कोणत्याही देशाची क्षमता आणि सामर्थ्य हे त्या देशाच्या तरुण लोकसंख्येच्या आकारावर आणि ताकदीवर अवलंबून असते. तरुणांची मोठी संख्या ही भारताची जमेची बाजू आहे. आज देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तरुणांच्या शिक्षण, कौशल्य आणि नेतृत्व विकासासाठी अनेक उपक्रम सुरू केले.
देशाच्या अमृत काळात आपण सर्वजण मिळून २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. यशाचा हा आलेख गाठण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अधिक मजबूत, सर्वसमावेशक आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी भक्कम चारित्र्य आणि नेतृत्वाच्या बळावर सक्रिय सहभागी होण्याची संधी युवकांना असून त्यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानही महत्त्वाचे- राज्यपाल
भारताची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ही उत्साही व गतिमान पिढी राष्ट्र निर्माणात मोलाची ठरणार आहे. २०४७ या वर्षापर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित राहता येणार नाही. यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात, पंथ देशातील विविध भागात वेगवेगळ्या असल्या तरी देश एकसंघ असल्याचे दिसून येतो. आजवर देशावर अनेक आक्रमणे झाली आहेत. मात्र आपल्या एकसंघतेच्या बळावर ही आक्रमणे परतवून लावल्याचे ते म्हणाले. भारतीय युवा संसद परिषदेला सहाव्यांदा उपस्थित राहात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तीत ही परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. देशातील सर्वच भागातील युवा नेते आणि तरुण या परिषदेला येऊन राष्ट्रनिर्मितीची चर्चा करीत असतात. आजच्या ‘स्क्रीन टाईम’च्या काळात ही फलदायी चर्चा महत्वाची ठरत असल्याचे ते यावेळी म्हणाले.