नागपूर, पुढारी वृत्तसेवा: विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात येतील, असा दावा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे राईट हॅन्ड असून, आपण बोलतो हे सत्य असल्याचा दावा देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे,.
पुढे आत्राम म्हणाले, कुणाशी चर्चा झाली हे सांगणार नाही. मात्र,आपण यावेळी झालेल्या चर्चेचे साक्षीदार आहोत असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दरम्यान,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून दाखवावी असे आव्हान दिले. तसेच आत्राम यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.