नागपूर : डिजिटलायझेशनच्या युगात महावितरणच्या नागपूर जिल्ह्यातील लघुदाब ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्याला मोठी पसंती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल 71.03 टक्के ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन पर्यायाचा अवलंब केला असून, एकूण जमा महसुलापैकी 77.23 टक्के रक्कम डिजिटल माध्यमातून प्राप्त झाली आहे. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे वीज ग्राहकांना घरबसल्या बिल भरणे सोपे झाले असून, त्याचा सकारात्मक परिणाम आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात एकूण 1 कोटी 53 लाख 63 हजार 390 व्यवहार झाले, ज्यामध्ये 3640.86 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. यापैकी 1 कोटी 11 लाख 39 हजार 116 व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने झाले असून, त्याद्वारे 2828.23 कोटी रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा झाले आहेत. नागपूर शहर मंडळात ऑनलाईन बिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मंडळातील 74.57 टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी डिजिटल पेमेंटचा वापर केला असून, एकूण महसुलाच्या 76 टक्के रक्कम म्हणजेच 2343.56 कोटी रुपये ऑनलाईन जमा झाले आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागातही 67.50 टक्के ग्राहकांनी 584.67 कोटी रुपयांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केला आहे.
एकेकाळी वीज बिल भरण्यासाठी केंद्रांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता इतिहासजमा होताना दिसत आहेत. जिल्ह्यात केवळ 28.98 टक्के ग्राहकांनीच ऑफलाईन पद्धतीने (रोख किंवा चेकद्वारे) बिलांचा भरणा केला आहे. एकूण महसुलात ऑफलाईन व्यवहारांचा वाटा आता केवळ 22.76 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. "डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे, तरी उर्वरित ग्राहकांनीही सुरक्षित आणि सोयीस्कर अशा डिजिटल पर्यायाचा अवलंब करावा," असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.