नागपूर: विदर्भातील प्रख्यात न्यूरोसर्जन आणि धंतोली येथील 'न्यूरॉन हॉस्पिटल'चे संचालक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे आज (दि.३१) सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण वैद्यकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास डॉ. पाखमोडे यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांना तत्काळ वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. अखेर सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. पाखमोडे यांची गणना राज्यातील उत्तम शल्यचिकित्सकांमध्ये केली जात असे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. केवळ एक कुशल डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर अत्यंत शांत, संयमी आणि रुग्णांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. कठीण प्रसंगातही रुग्णांना धीर देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते रुग्णप्रिय डॉक्टर होते.
डॉ. पाखमोडे यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "एक अभ्यासू, तज्ज्ञ आणि रुग्णांविषयी कळवळा असलेला संवेदनशील डॉक्टर आपण गमावला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. यासह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.