नागपूर : मनपा आयुक्त आणि स्वीय सहाय्यक भेटीची वेळ न देत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज सोमवारी अनोख्या प्रकारचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पक्षाने पारंपरिक खेळ जसे की कंचे, लंगडी आणि बॅडमिंटन खेळत आपली नाराजी व्यक्त केली.
प्रदेश प्रवक्ते व प्रदेश सरचिटणीस प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन नागपूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर आयोजित करण्यात आले. पक्षाने सांगितले की, बस चालक आणि वाहकांच्या प्रलंबित मागण्या अद्याप मान्य करण्यात आलेल्या नाहीत. आयुक्तांनी मागील भेटीत ८ दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असतानाही महिना पूर्ण होऊनही कोणतीही कारवाई झाली नाही.
प्रशांत पवार यांनी सांगितले की, "दिवाळी जवळ आली आहे. कर्मचारी यांचे पगार आणि इतर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही स्टार बस थांबवून पुढील आंदोलन करू." यावेळी स्वीय सहाय्यक हिवसे यांच्यावर दिशाभूल करण्याचा आरोप करत त्यांना निलंबन करण्याचे पत्र आयुक्त चौधरी यांना दिले.
यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.