नागपूर : भाजप आणि शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख कायम ठेवणे एक मोठे आव्हान आहे, असे मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात बोलताना ते म्हणाले की, पक्ष आपल्या विचारधारेपासून दूर गेलेला नाही, मात्र काही कार्यकर्त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाला त्याची किंमत मोजावी लागते.
यावेळी पटेल यांनी पक्षातील नेत्यांना उद्देशून प्रश्न केला की, 'दादा (अजित पवार) आणि तटकरे साहेब, तुम्ही नेहमी गर्दीत असता, पण त्यापैकी किती लोकांचे त्यांच्या गावात वजन आहे?' असे प्रश्न विचारत त्यांनी पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. जे कार्यकर्ते निस्वार्थपणे काम करतात आणि कधीही काही मागायला येत नाहीत, अशा कार्यकर्त्यांना शोधून त्यांचा सन्मान केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही हे दाखवण्यासाठी नागपूर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. भविष्यात विदर्भात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अमरावती किंवा यवतमाळ येथेही अधिवेशन घ्यावे लागेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
गेल्या 26 वर्षांच्या पक्षाच्या प्रवासात गेल्या अडीच वर्षांपासून अजित पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर होणाऱ्या टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिले. काही लोक या निर्णयावर टीका करतात, तर काही जण सत्तेत असणे आवश्यक असल्याचे सांगतात, असे पटेल यांनी स्पष्ट केले.