नागपूर : दिवाळीनंतर होऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग सीमांचा मसुदा राज्याच्या नगर विकास विभागाकडे अखेर सादर करण्यात आला आहे. समितीने मंजूर केलेल्या पुनर्रचित पूर्वीच्या 38 प्रभागांची संख्या कायम ठेवली असून प्रत्येक प्रभागात किमान 60 ते 65 हजार मतदार संख्या वाढली आहे. वाढलेली मतदार संख्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला बहुमताकडे नेणार का, याविषयीची उत्सुकता असल्याने इच्छुकांची प्रत्येक प्रभागात भाऊ गर्दी दिसत आहे.
विरोधकही आशावादी असले तरी एकसूत्रता नाही. सणासुदीचे दिवस लक्षात घेता इच्छुकांचे सर्वत्र होर्डिंग्स झळकत आहेत. एकूण 24 लाख 84 हजार 250 नोंदणीकृत मतदारांची नोंद करण्यात आली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता निश्चितच ही मोठी वाढ आहे. 37 प्रभागांमध्ये चार सदस्य तर प्रभाग 38 मध्ये तीन नगरसेवक कायम असणार आहेत. नगरसेवकांची एकूण संख्या 2017 प्रमाणे 151 अशी राहील. मसुदा सादर झाल्यामुळे मनपा निवडणुकीची तयारी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे दिसत आहे. 11 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
आयोगामार्फत पुनरावलोकन केले जाईल आणि सुधारणाची शिफारस केली जाईल. मनपाने 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान सार्वजनिक आक्षेप, हरकती यासाठी मसुदा प्रकाशित होणे अपेक्षित आहे. 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होईल. अंतिम मसुदा 15 सप्टेंबरपर्यंत नगर विकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. भाजपने गेल्यावेळी 108 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 29 बसपाला 10, शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ एक जागा जिंकली होती. यावेळी प्रभागनिहाय काहीसा सीमा बदल लक्षात घेता चित्र बदलण्याची आशा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.