Nagpur Election Violence
नागपूर : मुंबई काय नागपूर, कुठलीही दहशत खपवून घेतली जाणार नाही. दहशत माजवण्याचा कुणाचाही प्रयत्न चालू देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भगवा गार्ड संकल्पना तसेच नागपुरातील भाजप उमेदवारावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
निवडणूक आयोगाची यंत्रणा बोगस, दुबार मतदार हुडकून काढण्यासाठी कार्यरत आहे. ते त्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्याची गरज नाही. मुळात काही निवडक केंद्राबाहेरच ही यंत्रणा का आहे. मुंबईत सिलेक्टिव्ह काम सुरू आहे का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मुळात मुंबईत यंत्रणा उभारण्याची क्षमताच त्यांच्यात राहिलेली नाही, असा टोला देखील त्यांनी राज आणि उद्धव यांच्या नेतृत्त्वाखालील ठाकरे सेनेला लगावला. मुंबईतील जनता आता महायुतीच्या बाजूने कौल देणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, नागपूर मनपा निवडणुकीत भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर बुधवारी मध्यरात्री उशिरा करण्यात आलेल्या तीव्र निषेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भूषण शिंगणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्याचा प्रमुख, गृहमंत्री आणि एक मित्र म्हणून मी या ठिकाणी आलो आहे.
काँग्रेसने नागपुरात अतिशय नामचीन गुंडांना तिकीट दिले आहे. जनतेत दहशत माजविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मात्र, त्यांचा या प्रयत्नाला भाजप किंवा भाजपचा कार्यकर्ता घाबरणार नाही. जनता देखील अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात काल दुपारी तक्रार करण्यात आली. पूर्व सूचना दिली गेली, त्यानंतर ही कारवाई का झाली नाही याबाबतीत आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले. एकंदरीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या जीवघेण्या हल्ल्याचे आता नागपुरात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. दोषींवर कितीही मोठा बदमाश असला तरी कारवाई होणारच, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.