Nagpur nagar parishad election
नागपूर : जिल्ह्यात येत्या 2 डिसेंबररोजी होऊ घातलेल्या 12 नगरपंचायत आणि 15 नगरपरिषद निवडणुकीत 7 लाखांवर मतदार 546 सदस्य निवडणार आहेत. एकूण 7 लाख 32 हजार 132 मतदार या निवडणुकीत 546 सदस्य आणि 27 नगराध्यक्ष निवडण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावतील.
एकूण 374 प्रभाग असतील 27 निवडणूक निर्णय अधिकारी तर सत्तावीस सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्तव्यावर असतील. सुमारे 4455 अधिकारी व कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आक्षेपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या, स्ट्राँग रूम, कस्टडीत गेलेल्या ईव्हीएम यानिमित्ताने आता पुन्हा एकदा बाहेर आल्या आहेत.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 17 नोव्हेंबरपर्यंत ती सुरू राहील. छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल. उमेदवारांना 21 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत नाव मागे घेण्यासाठी वेळ आहे. निवडणुकीचे चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 891 मतदान केंद्रावर दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी 1078 कंट्रोल युनिट्स आणि 2156 बॅलेट युनिट्स वापरले जाणार आहेत.
सध्या देशभरात दुबार मतदार आणि दुबार मतदान यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असून यादीत घोळ असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. निवडणुकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून दुबार मतदान होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. दोन अथवा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असेल यांच्या नावापुढे दोन स्टार लावण्यात येतील. त्यांच्याशी संपर्क साधून तो मतदान कुठे करेल याची माहिती घेण्यात येईल. मतदान केंद्रावर हा मतदार आल्यास तो दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही याविषयाचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.