नागपूर: विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आणि आता शिर्डीच्या महाअधिवेशनानंतर भाजपचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लवकरच नागपूर जिल्हा परिषदेत ऑपरेशन लोटस राबवत तर नागपूर महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भाजप कामाला लागली आहे. अडीच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. स्थानिक पातळीवर प्रचंड नाराजी असताना भाजपला सत्ता मिळाल्याने माजी नगरसेवकही उत्साहात आहेत.
तिकिटासाठी मोठे घमासान पाहायला मिळणार आहे. परीक्षा आटोपताच महापालिकेचा शंखनाद होणार आहे. नागपूर महापालिकेचा विचार केल्यास येथे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रशासक म्हणून आयुक्त नियुक्त आहेत. प्रशासक बसण्यापूर्वीपर्यंत गेल्या तीन ‘टर्म’पासून नागपूर महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे. नागपूर लोकसभा आणि शहरात सहापैकी चार मतदारसंघात भाजपचेच आमदार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नागपूर मनपा,जीप प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा भाजपचा ‘झेंडा’ फडकविण्याच्यादृष्टीने भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. केवळ आता निवडणुकांच्या घोषणेच प्रतीक्षा आहे.
नागपूर जि.प.चा विचार केल्यास येथील विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. सध्या जि.प.वर काँग्रेस, मविआची सत्ता आहे. २०१९ मध्ये राज्यात महायुतीला बहुमत मिळूनही जिपत मविआची सत्ता आली. जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या दोन नेत्यांना मंत्री पदाची लॉटरी लागली आणि त्याचा परिणाम जि.प.निवडणूकांवर दिसून आला.५८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेस मविआने सत्ता काबीज केली.
आता केंद्रासह राज्यातही भाजप महायुतीची सत्ता असून ग्रामीणचा विचार करता महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या रुपाने जिल्ह्याकडे आणखी दोन मंत्रीपदे आहेत. यावेळी सहापैकी पाच आमदार महायुतीचेच आहेत. त्यामुळे याचाही फायदा भाजप महायुतीला आगामी जि.प.निवडणूकीमध्ये होणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी दिवसेंदिवस कमकुवत होताना दिसत असल्याने काँग्रेसला पुन्हा एकाकीपणे भाजपशी दोन हात करीत सत्ता मिळवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.