नागपूर : अमरावती रोडवरील वाडी- हिंगणा परिसरातील टोलनाक्याची आज (दि.१२) मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. दोन दिवसांपूर्वी देखील मनसेने वाडी नाक्यावर इशारा आंदोलन केले होते. अलीकडेच ६० किलोमीटर अंतरावर एकच टोल नाका राहणार असल्याचे सुतोवाच केंद्र सरकारने केल्यानंतर या परिसरात पाच टोल नाके अस्तित्वात कसे ? असा संताप व्यक्त करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
येत्या २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच राज ठाकरे यांचा ताफा रोखण्याचा उबाठा शिवसैनिकांनी प्रयत्न केल्यानंतर मनसेही आता विदर्भात असा काही प्रकार झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, या भूमिकेत आहेत. याविषयीचा इशारा आज (सोमवारी) मनसेतर्फे देण्यात आला.
एकाच परिसरात एकापेक्षा अधिक टोल नाक्यांवरील सुरू असलेली वसुली तातडीने थांबवा, अशी मागणी करीत मनसेने आंदोलन सुरू केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही वेळ केबिनच्या काचांची तोडफोड केल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी मनसे वाहतूक सेना जिल्हा संगठक कादिर, महाजन ,अजय उराडे, श्रीमंत दत्ता आदी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.