नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. या ॲल्युमिनियम फॉइल फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोट, आगीच्या घटनेत मृतांची संख्या सहा झाली आहे. शेंडे कुटुंबातील करण शेंडे नामक दुसऱ्या भावाचाही मेडिकल परिसरातील ओरियस या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही सोबतच दुचाकीने कामावर जात होते. रोजगारसोबतच शिक्षणही घेत होते. आई-वडील मोलमजुरीचे काम करतात अशी माहिती मिळाली. यापूर्वी या भीषण घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला व 6 जखमीवर आधी मेडिकल आणि नंतर खासगीत उपचार सुरू आहेत. निखिल शेंडे याचा घटनेच्या दिवशी मृत्यू झाला होता.
या घटनेत मृत कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पियुष दुर्गे (21), रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम,(26) - रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे,(25) - रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ ,(20)- रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे,(24) - रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर तर जखमींमध्ये मनीष वाघ - रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे - रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे - रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम - रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे - रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे - रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर यांचा समावेश आहे.