नागपूर

Nagpur crime : G-Pay व्यवहाराने उलगडले परसवानी कुटुंबाच्या बेपत्ते होण्याचे गूढ

११ दिवसांनंतर मिळाला लोकेशनचा सुगावा; नागपूर पोलिसांचे विशेष पथक पुण्यात दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : धंतोली परिसरातील बलराज मार्गावरील पॉश भागातून ११ दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाच्या शोधात नागपूर पोलिसांना अखेर महत्त्वाचा धागा मिळाला आहे. मोबाईल फोन बंद असल्याने आणि कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने रखडलेला तपास एका G-Pay ऑनलाइन व्यवहारामुळे नव्या वळणावर आला आहे. या डिजिटल व्यवहाराच्या आधारे कुटुंबाचे लोकेशन पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याचे समोर आले असून, नागपूर पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या शोधासाठी पुण्यात दाखल झाले आहे.

धंतोलीतील बलराज मार्गावरील दुर्गा सदन येथे राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची आई हर्षा, पत्नी इशिता, मुलगी खुशी आणि मुलगा कृष्णा हे २४ जूनपासून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

ऑनलाइन पेमेंट ठरले तपासातील महत्त्वाचा दुवा

तपासादरम्यान पोलिसांना कळले की, परसवानी कुटुंब इंटरनेटचा वापर केवळ ऑनलाइन पेमेंट करतानाच काही वेळासाठी सुरू करत होते. याचदरम्यान पिंपरी-चिंचवड परिसरातून झालेल्या एका G-Pay व्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या डिजिटल ट्रेलच्या आधारे पोलिसांना कुटुंबाच्या संभाव्य ठिकाणाचा अंदाज आला आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली.

आर्थिक संकटातून घेतला नागपूर सोडण्याचा निर्णय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात परसवानी कुटुंब काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे समोर आले आहे. जितेंद्र परसवानी हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या वाट्याची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मालमत्तेतील हिस्सेदारी आणि काही कायदेशीर अडचणींमुळे हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नसल्याची माहिती आहे. याच आर्थिक तणावातून त्यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कुटुंब अचानक कुठे गेले, त्यामागे नेमके कारण काय आणि ऑनलाइन व्यवहार कोण करत होते, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नातेवाईकांशी मर्यादित संपर्कामुळे तपासात अडचणी

तपासादरम्यान नातेवाईकांकडूनही फारशी ठोस माहिती मिळालेली नाही. परसवानी कुटुंबाचा अनेक वर्षांपासून इतर नातेवाईकांशी मर्यादित संपर्क असल्याने पोलिसांना सुरुवातीच्या टप्प्यात तपास करताना अडचणी आल्या. सध्या नागपूर पोलिसांचे विशेष पथक पुणे परिसरात कुटुंबाचा शोध घेत आहे. कुटुंब सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आर्थिक तणाव, संभाव्य दबाव किंवा अन्य कोणते कारण याचा तपास पोलिसांकडून सर्व बाजूंनी केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT