नागपूर : अल्पवयीन मुलीच्या कथित अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील २० वर्षीय आरोपीच्या पोलिस कोठडीतील वर्तनामुळे तपास यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अटकेनंतर आरोपीने चौकशीत सहकार्य करण्याऐवजी लॉकअपमध्ये पिझ्झा, उशी, मऊ गादी आणि डासांपासून संरक्षणासाठी मॉस्किटो रिपेलंटची मागणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बीबीएचा विद्यार्थी असलेल्या आरोपीने लॉकअपमधील अस्वच्छ भिंती, दुर्गंधीयुक्त शौचालय आणि डासांच्या त्रासाबाबतही तक्रारी केल्या. मात्र, कायद्यानुसार आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून विशेष किंवा चैनीच्या सुविधा देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान आरोपीने पीडित मुलीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलसह स्वतःच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यास नकार दिल्याने डिजिटल पुरावे संकलित करण्यात अडचणी येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला त्याने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांनाही विरोध केला होता. मात्र, नंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपी प्रश्नांना टाळाटाळ करत असून, आपल्या कृत्यांसाठी पीडित मुलीलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारी विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीने पोलिसांवर गंभीर आरोप केले. भाड्याच्या घरातून ७० हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचा, मारहाण केल्याचा तसेच चष्मा आणि बूट परत न केल्याचा दावा त्याने केला. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आरोपी स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी अशा प्रकारचे दावे करत असल्याचे सांगितले. तसेच, तो स्वतःलाच इजा करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितले की, आरोपीला कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, मऊ गादी, विशेष प्रकारचे अन्न किंवा इतर चैनीच्या सुविधा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आरोपी चौकशीत सहकार्य करत नसून त्याचे समुपदेशन सुरू आहे. तसेच, तो स्वतःला इजा करून घेऊ नये यासाठी त्याच्यावर २४ तास विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.