दीक्षाभूमी येथे विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची मोर्चाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.  
नागपूर

Nagpur Protest| अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात ९ डिसेंबरला नागपुरात भव्य मोर्चा

दीक्षाभूमीवर आंदोलनाची ठरली रणनीती

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा मुद्दा, आरक्षणाचे भवितव्य आणि त्याचे आगामी पिढ्यांवर होणारे संभाव्य परिणाम, या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. या प्रश्नांवर समाजाची एकत्रित भूमिका मांडण्यासाठी येत्या ९ डिसेंबर रोजी नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे नुकतीच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची दिशा, संघटनांमधील समन्वय आणि मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांचा सहभाग मिळविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणामुळे शैक्षणिक संधी, आरक्षणाचे लाभ आणि सामाजिक प्रतिनिधित्वावर संभाव्य परिणाम होऊ शकतात, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली. या विषयावर समाजाने विखुरलेले न राहता एकजुटीने भूमिका मांडण्याची गरज उपस्थितांनी अधोरेखित केली. विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय निर्माण करून आगामी आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यावरही भर देण्यात आला.

९ डिसेंबरच्या मोर्चासाठी एकजुटीचे आवाहन

आगामी मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या भावना, भूमिका आणि मागण्या प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. मोर्चाच्या यशस्वितेसाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर जनजागृती करावी, तसेच समाजबांधवांपर्यंत आंदोलनाचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीला प्रा. राहुल मून, दिनेश गोडघाटे, विलास भालेकर, विश्वास पाटील, माधवराव गावंडे (विदर्भ कुणबी समाज), अरुण शास्त्रकार (विदर्भ सुतार समाज), सागर दाभाडे, गितेश गजभिये, राजू इंगोले, भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष भगवानजी कांबळे, आशिष फुलझले, अरुण गाडे, डॉ. जयप्रकाश बोधी, मच्छिंद्र सावळे, साहेबराव सिरसाट, सुभाष रामटेके, यशवंतराव चव्हाण, भीमराव मेश्राम, आशिष कांबळे, शितल मेंढे, दीपंकर वाकोडे, सचिन रामटेके, विनोद मेश्राम, सचिन डोंगरे, अजय कोसे आणि सनी मून यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत विलास भालेकर, तुषार नंदागवळी, अरुण गाडे, माधवराव गावंडे आणि अरुण शास्त्रकार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. राहुल मून यांनी केले. संचालन आशिष फुलझले यांनी केले, तर मोर्चाचे मुख्य संयोजक मच्छिंद्र सावळे यांनी आभार मानले. ९ डिसेंबरच्या मोर्चात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT