नागपूर, पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद नागपूरच्या इतर भागात उमटू नयेत, यादृष्टीने पोलिस, प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सामाजिक, धार्मिक संघटनांनी देखील धर्मनिरपेक्ष, शांतताप्रिय नागपूरच्या सौहार्दाला गालबोट लावू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी या भागात पुतळ्याजवळ सकाळपासूनच गर्दी होती. (Nagpur Violence)
विहिप, बजरंग दलाने आधीच जाहीर केलेल्या निषेध आंदोलनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुष छळ करणाऱ्या औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा व इतर आक्षेपार्ह साहित्य जाळण्यावरून अफवांचे पेव पसरले. दोन्ही बाजूने प्रक्षोभक घोषणाबाजी, दाखल झालेल्या तक्रारीनंतर हिंसक जमावाने केलेली वाहनांची तोडफोड, जाळपोळ, पोलिस अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांवरील हल्ला अशी अशांतता निर्माण झालेल्या महाल परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून धरपकड सुरूच होती. (Nagpur Violence)
सध्या तणावपूर्ण शांतता चिटणीस पार्क, भालदारपुरा, गांधीगेट, हंसापुरी या परिसरात आहे. दंगलसदृश्य स्थिती निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या दोन्ही बाजूच्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली. समाजकंटकांकडून विविध अफवा जोरात असून सावध राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सर्वपक्षीयांनी शांततेचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (दि. 18) सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागात घटनास्थळी पाहणी करणार आहेत. यानंतर ते प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधतील.