राजेंद्र उट्टलवार
नागपूर: जिल्ह्यातील एकंदर 27 पैकी सुमारे 22 नगरपरिषद नगरपंचायतींमध्ये भाजपने रविवारी दुपारपर्यंत जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या काटोल, सावनेर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनिल देशमुख आणि सुनील केदार यांना या निवडणुकीत विधानसभेनंतर पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे.
दुसरीकडे काटोल नगराध्यक्षपदी शेकाप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना देशमुख यांनी बाजी मारत भाजपला आश्चर्यचकित केले आहे. स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोलमधील निकाल हा आमच्यासाठी अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. कामठी मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यावरून हा पराभव भाजपसाठी, बावनकुळे यांच्यासाठीजिव्हारी लागणारा म्हणता येईल.
काटोलमध्ये राष्ट्रवादी, शेकापला 13 तर भाजपला 12 ठिकाणी विजय मिळाला. भाजपसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिष्ठेच्या कामठी विधानसभा मतदारसंघात भाजप, बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि काँग्रेस अशी शेवटपर्यंत जोरदार त्रिकोणी लढत सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितद पवार पक्षाने या ठिकाणी उमेदवार दिल्यावर बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि भाजपची पंधरा वर्षे जुनी युती तुटली. माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर पुणे जमीन घोटाळ्यातील भागीदारीसह अनेक गंभीर आरोप केले. काँग्रेसचे शकूर नागानी 12 हजारांवर मते घेऊन सध्या आघाडीवर असून बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे उमेदवार अजय कदम आणि भाजपचे अजय अग्रवाल यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस सुरू आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर असले तरी त्यांनी भाजप आणि सुलेखा कुंभारे यांचे गणित तूर्तास बिघडवले आहे. नगरपंचायत बेसा पिपळा येथे भाजपने सर्व जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपदी कीर्ती धनराज बडोले विजयी झालेल्या आहेत. भिवापूर, उमरेड, बहादुरा,मोवाड नगर परिषदेत भाजपने एकहाती विजय मिळविला आहे. रामटेकमध्ये राज्यमंत्री ऍड आशिष जयस्वाल यांना काहीसे यश मिळाले असले तरी मौदा, उमरेड, भिवापूर येथे शिंदे सेनेला या निवडणुकीतही भाजपला अपेक्षित अशी मात देता आलेली नाही. एकंदरीत कधीकाळी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता भाजपचा बोलबाला आहे. अद्यापही महायुतीचे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट, अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जम बसवता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.