Nagpur legislative assembly makeover
नागपूर : राज्यभरातील नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीचे निकाल एकत्रित 21 डिसेंबरलाच लागतील असे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्यापासून अधिवेशन किती दिवस चालणार याविषयीची उत्सुकता होती. अधिकारी, कर्मचारी देखील आजच्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीकडे लक्ष ठेवून होते.
अखेर बुधवारी ( दि. ३) अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर पर्यंतच होणार यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या विधानभवन परिसराचा मेक ओव्हर जोरात सुरू आहे. खुर्च्या दुरुस्ती, परिसरातील रस्ते डांबरीकरण अंतिम टप्प्यात आहे. आधी 19 डिसेंबरपर्यंतचा कालावधी ठरला होता. या अधिवेशनानंतर लागलीच जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू झाले आहे. विविध विभाग, मंत्रालयीन फायलींचा समावेश असलेले अनेक ट्रक नागपुरात दाखल झाले असून अधिकारी, कर्मचारी नागपुरात मुक्कामी आले आहेत. सध्या थंडीचा जोर कमी झाला असला तरी लवकरच नागपूरची हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवास येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कंत्राटदारांनी थकित बिलांसाठी पुकारलेले काम बंद मागे घेतल्यानंतर विधान भवन, रवी भवन, आमदार निवास येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. निवास व कार्यालयीन व्यवस्था संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. आमदार निवासातील सुविधाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.