Nagpur News |
नागपूर : सरपंच असताना पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांचे पती विष्णू कोकड्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जि. प. सत्तेतील माजी मंत्री सुनील केदार गटाला हा धक्का म्हणता येईल. केदार यांचे अनेक समर्थक भाजपने आपल्याकडे वळवले आहेत.
बनावट कायदेशीर कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता यात आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांचे पती विष्णू कोकड्डे यांच्यावर खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विष्णू कोकड्डे हे सरपंच असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट व गैरकायदेशीर कागदपत्रांद्वारे पिपळा डाक बंगला येथील २.३२ हेक्टर जमिनीवर लेआउट पाडून त्याची विक्री केली. पिपळा ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. या प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावनेर यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यांची चौकशी समिती गठित केली. चौकशीत माजी अध्यक्षा कोकड्डे यांचे पती विष्णू कोकड्डे हे दोषी आढळून आले. या प्रकरणात राजेंद्र नारनवरे व संतोष महतो यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सरपंच विष्णू कोकड्डे यांच्याशी संगनमत करून ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र बन्सोड यांच्यावर दबाव टाकून कागदपत्रे तयार केली.
या चौकशीच्या अनुषंगाने पंचायत समिती सावनेरचे गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर यांनी विष्णू कोकड्डे, राजेंद्र नारनवरे व संतोष महतो यांच्या विरुद्ध खापरखेडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची नोंद केली असून या गैरप्रकारात आणखी कोण राजकीय लोक सहभागी होते, याचा तपास आता सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.