Kuhi Khetapur Bus Service
नागपूर : कुही तालुक्यातील दुर्गम भागातील खेतापूर या छोट्याशा गावातील विद्यार्थिनींच्या प्रवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माध्यमिक शिक्षणासाठी सुमारे सात किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव येथे ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी इयत्ता नववीत शिकणाऱ्या टीना वैकुंठे हिने सामाजिक माध्यमांवर आपली व्यथा मांडली. तिच्या या हाकेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्पर प्रतिसाद देत थेट खेतापूर गाठले.
जिल्हाधिकाऱ्यांनी टीना तसेच तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या गावातील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बससेवेसह गावातील अन्य समस्यांचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देत खेतापूर ते नागपूर एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. टीना आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
विद्यार्थिनींच्या प्रवासाचा प्रश्न सोडवतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील अन्य समस्यांचाही आढावा घेतला. खेतापूर ते डोंगरगाव या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून येत्या सप्टेंबरपासून हे काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
गावातील गोपाळ समाजाच्या झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्नही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. न्यायालयाच्या निर्णयानुसार हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पाळीव जनावरांवर होणारे वाघांचे हल्ले कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी आमदार डॉ. संजय मेश्राम, तहसीलदार अमित घाडगे, सरपंच प्रदीप खोब्रागडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. एका विद्यार्थिनीने सामाजिक माध्यमांवर मांडलेल्या समस्येची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गाव गाठून केलेल्या कार्यवाहीमुळे खेतापूरच्या विद्यार्थिनींच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.