नागपूर: खैरी (ढालगाव) येथील प्रत्यक्ष सर्वेक्षणात ४ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत पोटदुखीचा त्रास असलेले ११ रुग्ण आढळले होते. यानंतर केलेल्या सर्वेक्षणात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत यांनी सांगितले.
सावनेर तालुक्यातील खैरी (ढालगाव) येथे ग्रामपंचायत जवळील पाईपलाईनला ३ जानेवारी रोजी गळती असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ ४ जानेवारीला त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर ५ जानेवारीला एका ट्रॅक्टरमुळे पाईपलाईन पुन्हा फुटली होती. त्याचीही तात्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, खापा येथील DAD कॅम्प अंतर्गत 65 आणि 25 ही संख्या तपासलेल्या लाभार्थींची आहे. 47 लाभार्थी ब्लड प्रेशर तपासणी करता आलेले होते. 18 रुग्ण शुगर तपासणीसाठी आले होते. 25 रुग्ण इतर हातपाय दुखीचे व बाकी समस्याचे होते. दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या रुग्णांची ही संख्या नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले.
खैरी (ढालगाव) येथील नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोग्य विभाग आपल्या सेवेसाठी २४ तास तत्पर आहे. काही त्रास जाणवल्यास त्वरित स्थानिक आरोग्य पथकाशी संपर्क साधावा." असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.