Ganja Pudhari
नागपूर

Nagpur Ganja seizure: कन्हानमध्ये ९ किलो गांजासह तिघांना अटक

ओडिशातून गांजा आणून पुरवठ्याचा संशय; एसयूव्ही, तीन मोबाईल व रोकडसह १२.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : ओडिशातून गांजा आणून कन्हान परिसरात त्याचा पुरवठा करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. आरोपींकडून ९ किलो गांजा, एसयूव्ही, तीन मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण १२ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गांजा तस्करीच्या मोठ्या नेटवर्काचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातून गांजा घेऊन एक व्यक्ती कन्हान परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवून संशयास्पद हालचालींवर लक्ष केंद्रित केले.

यादरम्यान पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडून सुमारे ९ किलो गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत अंदाजे १ लाख ८० हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे सूरज राजेंद्र चव्हाण (३०, रा. दिघोडा, उत्तर प्रदेश), हिमांशू नंदलाल शर्मा (२६, रा. दिघोडा, उत्तर प्रदेश) आणि शुभम कपिलदेव शाही (३२, रा. कन्हान) अशी आहेत.

एसयूव्हीसह १२.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजासोबत पोलिसांनी यूपी ५७ बीपी ७६१० क्रमांकाची एक्सयूव्ही-३०० ही एसयूव्ही जप्त केली असून, तिची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. याशिवाय सुमारे ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि २ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. गांजासह जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख १२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात गांजा ओडिशातून कन्हानमध्ये आणण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याचा पुढील पुरवठा करण्याची तयारी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा गांजा नेमका कोणाला पुरवठा केला जाणार होता, तसेच तस्करीच्या या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या पथकाची कारवाई

ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल मस्के आणि कन्हानचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एनडीपीएस पथकातील एपीआय अजितसिंग देवर, पीएसआय प्रवीण भिमटे, प्रवीण देव्हारे, अमृत किंगे, प्रकाश ढोके, नापोका अमोल नागरे, पोलिस कर्मचारी अनिल आणि चालक अविनाश तुमडाम यांनी कारवाईत सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्हान पोलिस ठाण्याच्या पथकानेही कारवाईत सहकार्य केले. कन्हान पोलिस ठाण्याचे पीएसआय गुप्ता आणि पोलिस कर्मचारी प्रणित दहिवले यांचाही पथकात सहभाग होता.

आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनोविकारजन्य पदार्थ (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा तस्करीमागील व्यापक नेटवर्काचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT