Hanuman Temple Jamsavli  Pudhari
नागपूर

Jamsavli Hanuman Lok |मध्यप्रदेश–महाराष्ट्र सीमेवरचे जामसावळी ‘हनुमान लोक’: भाविकांना आकर्षित करणारे श्रद्धास्थान

पांढुर्णा जिल्ह्यातील सौसर तालुक्यातील सातपुड्याच्या वनराईत जामसावळी हनुमान धाम वसलेले आहे

पुढारी वृत्तसेवा

Hanuman Temple Jamsavli

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : नागपूरपासून सुमारे 80 किलोमीटर आणि मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर छिंदवाडा महामार्गावर सातपुडा पर्वताच्या शेवटच्या रांगाच्या कुशीत वसलेले जामसावली हे आज भाविकांची गर्दी असलेले तीर्थक्षेत्र झाले आहे. हनुमानलोक या प्रकल्पाच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राचा समूळ कायापालट होत आहे. विश्राम करीत पहूडलेली महाकाय हनुमंतरायाची मूर्ती असलेले 'जामसांवली' नवा इतिहास निर्माण करीत आहे.

जामसावली धाम,चमत्कार, श्रद्धा आणि आधुनिकतेचा अपूर्व संगम असून आस्था, विश्वास आणि भक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. सातपुड्याच्या हिरव्यागार वनराईत वसलेले पांढुर्णा जिल्ह्यातील सौसर तालुक्यातील हे चमत्कारिक जामसावळी हनुमान धाम आता केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार प्रसिद्ध झाले आहे.

श्री रामनवमीपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे हे क्षेत्र भक्तीच्या महासागरात परावर्तित झाले आहे. दररोज लाखो भाविक हनुमानजींच्या दर्शनासाठी येथे येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात. मंदिर संस्थानतर्फे हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा आणि नववर्षाव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवार व शनिवारी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या एका वर्षात या हनुमान धामाचे स्वरूप उत्तरोत्तर बदलत आहे.

असा आहे चमत्कारिक इतिहास

जामसावळी धामाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि अद्भूत मानला जातो. येथे प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमानजी पिंपळाच्या वृक्षाखाली निद्रा मुद्रेत विराजमान आहेत. हे देशातील अद्वितीय मंदिरांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की, हजारो वर्षांपूर्वी ही विशाल मूर्ती गवतामध्ये लपलेली होती, जी एका शेतकऱ्याने शेत नांगरत असताना शोधली. त्यानंतर हे स्थळ श्रद्धास्थान बनले आणि आज कोट्यवधी भक्तांच्या आस्थेचा आधार आहे.

१९९६ मध्ये मर्यादित संसाधनांतून सुरू झालेले हे मंदिर आज 'हनुमान लोक' सारख्या विशाल धार्मिक संकुलाच्या रूपात विकसित होत आहे. मध्य प्रदेश सरकारद्वारे ३१४ कोटी रुपये खर्चाची ही योजना साकारली जात आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचीही घोषणा झाली आहे.

पूर्णत्वाकडे गेल्यावर हे धाम उज्जैनच्या 'महाकाल लोक'च्या धर्तीवर भव्य आणि जागतिक दर्जाचे धार्मिक केंद्र म्हणून नावारूपास येईल. यासंदर्भात मंदिर संस्थानचे अध्यक्ष गोपाल शर्मा यांनी सांगितले की, "हनुमान लोक केवळ मंदिराचा विस्तार नसून आधुनिक तंत्रज्ञान आणि पौराणिक परंपरांचा अनोखा समन्वय आहे." सुमारे ३० एकर परिसरात विकसित होत असलेला हा कॉरिडॉर राज्यातील मुख्य धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.

येथे धार्मिक आस्थेसोबतच लोकसहभाग आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा व्यापक समावेश पाहायला मिळतो. गेल्या वर्षात ५ कोटींहून अधिक खर्च करून ११ एकर जमीन खरेदी, शासनाकडून प्राप्त २५ एकर जमिनीवर 'बजरंग गोशाळा' स्थापना, भव्य सभामंडप निर्मिती, प्रसादम आणि भक्त निवासाचा जीर्णोद्धार, लिफ्ट, प्रशासकीय भवन, आर.ओ. पेयजल व्यवस्था, पूजा साहित्य दुकानांचे पद्धतशीर पुनर्वसन, पेव्हर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, पार्किंग आणि सोलर प्लांटची स्थापना करण्यात आली आहे. आज मंदिर संस्थानकडे ६८ एकरपेक्षा अधिकची स्वतःची मालमत्ता आहे.

जागतिक पटलावर ओळख

जामसावळी धाम आता राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सोशल मीडिया आणि आधुनिक माध्यमांच्या द्वारे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'हनुमान लोक'च्या दुसऱ्या टप्प्यातील आगामी योजनांमध्ये भव्य गर्भगृह निर्माण, चिरंजीवी पथ, नाला संरक्षण व सौंदर्यीकरण, भव्य एसटीपी प्लांट, सोलर विस्तार आणि मानसिक पुनर्वसन केंद्र यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.

हनुमान जन्मोत्सव, भक्तीचा महाकुंभ,रोज वाढतेय गर्दी

गत २६ मार्चपासून जामसावळी धामात सुरू झालेल्या हनुमान जन्मोत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. २ एप्रिलपर्यंत पद्मविभूषण तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्रीरामभद्राचार्य महाराज यांच्याद्वारे 'श्रीराम कथा' वाचन केले जात आहे. त्यांनी या ठिकाणी भविष्यात श्रीराम ,जानकीच्या मंदिराचे सुतोवाच केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT