जैन मंदिरात चोरी 
नागपूर

नागपूर : जैन मंदिरात चोरी; चांदीच्या पाच मूर्तीसह दानपेटीतील रक्कम लंपास

Nagpur Crime : घटना सीसीटिव्हीत कैद

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : जुनी शुक्रवारी येथील श्री शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरातून पाच मूर्तींसह अंदाजे ३ लाखांचा ऐवज गुरुवारी (दि.२७) मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्याने चोरून नेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मंदिराची इत्यंभूत माहिती असणाऱ्या युवकानेच ही चोरी केल्याचा संशय नागेंद्र दिगंबर जैन समाजाचे सचिव मुकेश सिंहावत यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

चोरट्याने मंदिरात प्रवेश केल्यानंतर फक्त चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री व मंत्र कोरलेले भामंडल नेले. मात्र, चांदीसारख्या चमकणाऱ्या अष्टधातू व सोन्यासारख्या चमकणाऱ्या पितळेच्या मूर्तीना हात लावला नाही. इतकेच नाही तर चांदीचा पत्रा लावलेले लाकडी सिंहासन देखील नेले नाही, अशी माहिती सचिवांनी दिली. पोलिसांनी तातडीने या चोरीचा छडा लावावा, धार्मिक स्थानाची सुरक्षा मजबूत करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या जैन मंदिराच्या मागच्या बाजूने नागनदी असून लागूनच खैरे कुणबी भवन व जामदार हायस्कूल आहे. दोन्ही ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. खैरे कुणबी भवन पाडले असल्याने तिथे मोकळी जागा आहे. चोरट्याने जामदार हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या कामावरची शिडी आणून मंदिराच्या नागनदीच्या बाजूच्या दरवाजाकडे लावली. या दरवाजाची कडी आतून लावलेली असतानाही ती चोरट्याने बाहेरून तोडली व पहिल्या मजल्यावरील मंदिरात प्रवेश केल्याची माहिती सिंहावत यांनी पोलिसांना दिली.

या मंदिराची तळमजल्यासह दोन मजली इमारत आहे. तळमजल्यावर वास्तव्यास असलेले एक कुटुंब मंदिराची व्यवस्था बघते. पहिल्या मजल्यावर मंदिर आहे. दुसऱ्या मजल्यावर दर्शनापूर्वी वस्त्र बदलली जातात. मंदिर सकाळी ६ वाजता सुरू होते व दुपारी २ वाजता बंद होते. सायंकाळी ७ वाजता फक्त एकदा आरतीसाठी उघडले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT