नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूर-जबलपूर हायवेवर एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले, जे विदारक चित्र खूप व्हायरल झाले. या व्हिडीओ नुसार एक पती अपघातानंतर विनवणी करतो पण कुणीही मदतीला न आल्याने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागच्या बाजूला बांधून सुसाट वेगाने गावाकडे चालला होता. ते दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला अन् अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एका ट्रकने कट मारल्यामुळे हा अपघात झाला होता.
रस्त्यात कोणत्याही वाहनचालकाकडून मदत न मिळाल्याने त्या व्यक्तीला दुचाकीवरच पत्नीचा मृतदेह घेऊन जावे लागले. अखेर या महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकाचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं आहे.
एआयच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेण्यात आला आहे. सुमारे सातशे किलोमीटर दूर अंतरावर ग्वालियर–कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडले. सत्यपाल राजेंद्र असे या ट्रकचालकाचे नाव असून तो फर्रुखाबाद, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या शोधमोहोमेत एआय तंत्रज्ञानाचा आधार घेतला.
जबलपूर रोडवरील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचा शोध घेणे अत्यंत अवघड काम होते.कारण या प्रकरणातील पीडित व्यक्तीकडे फक्त लाल ट्रकने धडक दिली एवढीच माहिती होती. केवळ या माहितीच्या आधारे सातशे किलोमीटर दूर त्या लाल ट्रकपर्यंत पोहोचत पोलिस पथकाने आरोपीला अटक केली, अशी माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
चार टोलनाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही एआयच्या माध्यमातून स्कॅन केले आणि त्यातूनच या ट्रकचा शोध लागला, असेही हर्ष पोद्दार यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस आणि आयआयएम नागपूर यांनी मारवल नावाचे सॅाफ्टवेअर तयार केले आहे.या सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून या गुन्ह्याची उकल झाली आहे .