Injured ite surgery
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात एका गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या घारीला नागपुरात ट्रान्झिट सेंटरमध्ये अवघड शस्त्रक्रिया करून जीवनदान देण्यात यश आले. पक्षीप्रेमी नागरिक कमलेश कांबळे यांनी ट्रांझिट च्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला व विस्तृत माहिती दिली. नंतर ट्रांझिटच्या रेस्क्यू पथकातील लोकांनी गंभीर जखमी अवस्थेतील घार (Black Kite) उपचारासाठी 17 सप्टेंबरला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर आणली.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तिचे प्राथमिक निरीक्षण केले. ती अतिशय आजारी होती. अन्ननलिका पूर्णपणे फाटलेली होती. त्यामुळे काहीही खाल्लेलं, पिलेले पाणी सुद्धा फाटलेल्या भागातून निघून जात होते. जेव्हा केव्हा ही जखमी झाली असेल तेव्हापासून तिच्या पोटात काहीही जातं नव्हते. त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात अशक्त झाली होती. तिला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम अन्ननलिका शिवून मग गळ्याला टाके मारले, काही दिवस तिला हातांनी खाऊ (Forcefully hand feeding) घातले.
जखम थोडी बरी झाल्यावर ती स्वतः स्वतः खायला लागली. तिची जखम बरी झाल्याची व संपूर्ण वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून तिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी निसर्ग मुक्त करण्याचे प्रमाणपत्र दिले. आता तिला निसर्गमुक्त करण्यात आले.
नागरिकांच्या तत्परतेने व लगेच मिळालेल्या उपचाराने आज त्या घारीचा जीव वाचला. नाहीतर काही दिवसातच अन्न पाणी न मिळाल्याने त्या बिचाऱ्या घारीचा जीव नक्कीच गेला असता. पेशंट कुठलाही असो वाघ असो किंवा पक्षी लवकर व योग्य प्रामाणिकपणे उपचार करणे हा ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरच्या लोकांचा धर्म व आद्य कर्तव्य असल्याची माहिती डॉ विनिता व्यास, उपवनसंरक्षक यांनी दिली.
यश काळे, सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश भडांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच कुंदन हाते, समन्व्यक ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर यांच्या नेतृत्वात डॉ राजेश फुलसुंगे, डॉ प्रियल चौरागडे, पशुपर्यवेशक सिद्धांत मोरे, पंकज थोरात, प्रवीण मानकर यांच्या अथक परिश्रमातून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरचा रिकव्हरी रेट 79.5% वर पोहचला आहे. अनेक संकटग्रस्त वन्यजीवांना नवसंजीवनी मिळतं आहे.