IAF officer wife viral video file photo
नागपूर

Viral Video: धर्मांतर आणि बलात्काराच्या कथित प्रकरणात हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनवणी करणारा VIDEO समोर

IAF officer wife viral video: धर्मांतर आणि बलात्काराच्या कथित प्रकरणात भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची विनवणी करणारा व्हिडिओ समोर

मोहन कारंडे

IAF officer wife viral video

नागपूर: "मला सोडा..." २४ वर्षीय तरुणी अत्यंत अगतिकतेने ओरडत आहे आणि तिचा जुना वर्गमित्र अय्याज ताज मडारे (वय २६) तिचे हात बळजबरीने पकडून काही धार्मिक श्लोक म्हणत तिच्या अंगावर वारंवार फुंकर घालत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका थरारक व्हिडिओमध्ये हे दृश्य कैद झाले असून, या धक्कादायक प्रकारानंतर नागपुरात खळबळ उडाली आहे.

नागपूर येथे कार्यरत असलेल्या एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेने तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा, अश्लील व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा, लाखो रुपये उकळल्याचा आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी मुख्य आरोपी अय्याज मडारे आणि अमीन शेख (वय ३०) या दोघांना अटक केली असून, मध्य प्रदेशातील तामिया येथील रहिवासी असलेला तिसरा आरोपी हजरत मौलाना याचा पोलीस शोध घेत आहेत.

हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार, ३ लाखांची खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय महिला प्रॉपर्टी डीलिंगचे काम करते, तर तिचे पती हवाई दलात अधिकारी आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी अय्याजने प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने पीडितेशी संपर्क साधला आणि तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्या कृत्याचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढण्यात आले. या अश्लील व्हिडिओच्या जोरावर आरोपीने पीडितेला वारंवार ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्याकडून तब्बल ३.०९ लाख रुपये उकळले.

निर्जन स्थळी नेऊन 'अघोरी' पद्धतीने धर्मांतर

पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी अय्याज तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकत होता आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तिच्याकडून विविध कृत्ये करून घेतली जात होती. ३१ मे रोजी आरोपीने तिला नागपूरजवळील कळमेश्वर येथे नेले. तिथे तिची ओळख अमीन शेख आणि हजरत मौलाना यांच्याशी करून देण्यात आली. या तिघांनी तिला एका निर्जन स्थळी नेऊन काही धार्मिक विधी केले आणि तिचे धर्मांतर पूर्ण झाल्याचा दावा केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाच प्रकार दिसत असून, या विधीनंतर तिच्यावर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचाही गंभीर आरोप पीडितेने केला आहे.

पती परत आल्यानंतर गुन्हा दाखल

तीन दिवसांपूर्वी पीडितेचे पती कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर तिने घडलेला हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर पीडितेने पतीसह सोनेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, खंडणी, सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT