जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर. pudhari photo
नागपूर

नागपुरातही एचएमपीव्हीचा शिरकाव !

HMPV Virus: १४ वर्षाच्या मुलीसह ७ वर्षाच्या मुलाचे नमुने एम्स व एनआयव्हीत रवाना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) वेगाने पसरत आहे. भारतात देखील या विषाणूच्या रुग्णांची नोंद झाली असून उपराजधानी नागपूर नागपुरमध्येही मंगळवार ७ जानेवारीला या विषाणूमुळे बाधित दोन संशयित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये एक १४ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली. अधिक तपासणीसाठी रुग्णाचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) व पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतरच हे एचएमपीव्हीचे रुग्ण आहेत, किंवा नाही, हे निश्चित करण्यात येईल. सद्यस्थितीत तरी नागपुरात एचएमपीव्हीचा एकही रुग्ण नसल्याची स्पष्टोक्ती डॉ. इटनकर यांनी केली.

कर्नाटक, गुजरातनंतर आता नागपुरमध्येही या विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील रहिवासी असलेली ही १४ वर्षांची मुलगी व ७ वर्षाचा मुलगा काही दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप असल्याने रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराला आले. औषधी देऊनही आजार बरा होत नसल्याने रुग्णांचे ‘पीसीआर’किटच्या माध्यमातून नमुने घेत ते नीरीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता दोघेही ‘एचएमपीव्ही’ संशयित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. या विषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, यात घाबरण्याचे कारण नाही. दोन्ही रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. दोन्ही मुलांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी नमुने ‘एम्स’मध्ये पाठविण्यात आले आहेत तसेच विषाणूच्या सखोल माहितीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल येण्याची शक्यता आहे. या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता कमी असली तरी शासकीय रुग्णालयांना ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला ‘एम्स’चे संचालक डॉ. प्रशांत जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी उपस्थित होते.

दोन्ही रुग्णांची प्रकृती ठणठणीत

महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार या दोन्ही रुग्णांची विशेष अशी ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. ते एचएमपीव्ही संशयित असल्याचे निदर्शनास आले. परंतु या दोन्ही विद्यार्थी रुग्णांची प्रकृती आता ठणठणीत असून ते मंगळवारला शाळेतही गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या एचएमपीव्ही विषाणूबाबत घाबरण्याचे कारण नसून, शासन आणि प्रशासनाच्या निर्देशाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT