नागपूर : बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले, हत्या आणि अत्याचारविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या मंगळवारी 10 डिसेंबर रोजी आंदोलन पुकारण्यात येणार आहे. शहरातील सात ठिकाणांवरून बाईक रॅली निघतील आणि व्हेरायटी चौक येथे जाहीर सभेत या एकत्रित मोर्चाचा समारोप होणार आहे. याविषयीची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी पत्र परिषदेत दिली.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने भारत सरकार व संयुक्त राष्ट्र संघ तसेच मानवाधिकार आयोगावर यासंबधी कारवाईबाबत हिंदू रक्षणासाठी दडपण आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे आणि विविध जातीच्या संघटनांनी यात समर्थन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इस्कॉनच्या चिन्मयदास प्रभूंना बांगलादेश पोलिसांनी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना कायदेशीर मदत मिळू नये म्हणून त्यांच्या वकिलाची हत्या करण्यात आली. दुसरे वकील गंभीर अवस्थेत आयसीयुत आहेत. हिंदू उद्योगपती अंबुज शर्मा यांची हत्या करण्यात आली. मुस्लिम कट्टरपंथी संघटन जमात ए इस्लामीने बांगलादेशची सत्ता आपल्या हाती घेतली असून हिंदू समाजावरील संकट अधिकच वाढले असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
मध्य नागपुरातील बाईक रॅली बडकस चौकातून, पूर्व नागपुरातील रॅली सतरंजीपुरा चौकातून, उत्तर नागपुरातील रॅली कमाल टॉकिज चौकातून, पश्चिम नागपुरातील रॅली छावणी चौकातून, दक्षिण पश्चिम नागपुरातील रॅली अजनी चौकातून तर दक्षिण नागपुरातील बाईक रॅली सक्करदरा चौकातून निघेल अशी माहिती देण्यात आली. मध्य व पूर्व नागपुरातील बाईक रॅली टेकडी गणेश मंदिर, मानस चौक येथे, उत्तर व पश्चिम नागपुरातील बाईक रॅली संविधान चौकात तर दक्षिण पश्चिम व दक्षिण नागपुरातील रॅली यशवंत स्टेडियम येथे एकत्र होतील. तेथून सर्वजण मुंजे चौकमार्गे व्हेरायटी चौकाच्या दिशेने पायी मार्गक्रमण करतील. यावेळी महानगर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे, रमेश मंत्री, विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तीतरे, अमोल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.