नागपूर: शहरात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडविली. उड्डाणपूल, सिमेंट रस्त्याची कामे सुरू असलेल्या भागात पाणी साठले. रस्त्यावर पाणी भरलेले खड्डे, आउटलेट न मिळाल्याने रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते.
रस्त्यावरील साठलेल्या पाण्यातून वाट काढत नागपूरकरांची विशेषत वाहनचालकांची चांगलीच दैना उडाली होती. गांधीबाग, अग्रसेन चौक, चितार ओळ, इतवारी, गांधीगेट, अशोक चौक अशा विविध भागात पावसाने मनपाचे पावसाळीपूर्व नाले सफाईचे देखील पितळ उघडे पडले. अनेक बंद पडलेली दुचाकी वाहने रात्रीच्या वेळी हातात घेऊन जाण्याची कसरत नागरिकांना करावी लागली. गटर तुंबल्याने ड्रेनेज सिस्टिम देखील पूर्णतः कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले.