नागपूर : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. उपराजधानीत कालपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम आज दिवसभरही कायम होती. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे.
पुढील २४ तासांत अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दुपारी यलो अलर्ट दिला होता; मात्र सायंकाळी त्यात सुधारणा करत ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यानुसार ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिली आहे.