नागपूर : राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली असताना, कडक उन्हाने तापलेल्या नागपूरला अखेर बुधवारी (दि.२६) रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पहिल्याच दमदार पावसाने नागपूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला असून, वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. मात्र, याच पावसाचा फटका विमान प्रवाशांना बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुधवारी रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने काही वेळातच जोर धरला. अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागपूरकरांनी या पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला. या पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असून, घरोघरी सुरू असलेल्या कुलर आणि एसीला काहीशी विश्रांती मिळाली आहे.
एकीकडे पावसाचा आनंद असताना, दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून आलेल्या इंडिगोच्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. प्रवाशांना विमानातून उतरण्यासाठी एरोब्रिजची सोय उपलब्ध नसल्याने, त्यांना पावसात भिजतच बसपर्यंत जावे लागले. विशेष म्हणजे, याच विमानातून प्रवास करणाऱ्यांमध्ये राज्याचे मंत्री आशिष जैस्वाल आणि आमदार आशिष देशमुख यांचाही समावेश होता.
या पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता वेग आला असून, बळीराजाची लगबग वाढली आहे.
बुधवारी (दि.२६) रात्रीपासून वर्धा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. हिंगणघाट, समुद्रपूर, वर्धा तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीची पाणी पातळी वाढली असल्याने अल्लीपूर-अलमडोह मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वर्धा-सरूळ मार्गही पुरामुळे बंद करण्यात आला आहे. पावसामुळे उभ्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याने पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.