Nagpur Weather Alert
नागपूर: नागपूर शहरात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवार, बुधवार काहीशी दमदार हजेरी लावत ओलेचिंब केले. शहरात 91.4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मात्र, प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार केवळ गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता. हा अंदाज काहीसा चुकीचा ठरला.
चंद्रपूरला रेड अलर्ट तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. नागपुरात बुधवारी सकाळी अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तो बघण्यासाठी तसेच मासेमारी करण्यासाठी नेहमीप्रमाणे अनेकांनी तिकडे धाव घेतली. नाग नदी, कोलार नदी दुथडी भरून वाहत होती.
मात्र, अधून मधून पाऊस उघडीप देत असल्याने मुंबईप्रमाणे नागपुरात फारशी चिंता नाही. वाहतुकीच्या दृष्टीने भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील बस वाहतूक काहीशी प्रभावित झाली. तर मुंबईत गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई नागपूर विमान सेवेला फटका बसला. मंगळवारी मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या अनेक विमानाना उशीर झाला. रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली. यात मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस, मुंबई नागपूर सेवाग्राम गीतांजली एक्सप्रेसच्या प्रवाशांना फटका बसला.