नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि. २८) झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भाग जलमय झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने उद्या २९ जुलै रोजी रेड अलर्ट घोषित केला आहे तर २८ ते ३० जुलैदरम्यान नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी बुधवार, २९ जुलै रोजी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आज मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले. दुपारी २.३० वाजेपर्यंत नागपूर शहरात तब्बल १०८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे.
अवघ्या दीड तासात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाल्याने शहरातील अनेक भाग जलमय झाले. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली, तर अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठी गैरसोय झाली.
नरेंद्र नगर परिसरात पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांना मोठा फटका बसला. गिट्टीखदानसह शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.