Nagpur Gopichand Padalkar protest
नागपूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आज (दि.२०) पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नागपूरसह राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर आले. नागपुरात व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.
पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, निषेधाच्या घोषणाबाजीनंतर सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात जिल्हा अध्यक्ष, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, सलील देशमुख, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात तक्रार दाखल करण्यात आली. आज शनिवारी व्हेरायटी चौक, गांधी पुतळ्या समोर नागपूर ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. निदर्शने संपल्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याचे निवेदन देण्यात आले.