Nagpur House Burglary 
नागपूर

Nagpur House Burglary : गिट्टीखदान हद्दीतील दोन घरफोड्यांचा छडा; दोन आरोपी ताब्यात

३ लाख ९० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; आणखी दोन आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा वाहन चोरीविरोधी पथकाने छडा लावला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीसदृश्य दागिने, पूजेचे साहित्य, भांडी, नाणी आणि मोबाइल असा एकूण ३ लाख ९० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणात उमेश राजेश खांडेकर (वय २२, रा. पडकर चौक, गंगाबाई, पोलिस ठाणे कोतवाली, नागपूर) आणि विकास उर्फ विकी विजय पाली (वय २२, रा. म्हाडा क्वार्टर, ब्लॉक क्रमांक ४१, क्वार्टर क्रमांक ६४४, कपिलनगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांमध्ये घरमालक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीसदृश्य दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना वाहन चोरीविरोधी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान उमेश खांडेकर आणि विकास पाली यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोन्ही घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून सोन्या-सदृश्य कानातील टॉप्स, अंगठी, गळ्यातील लॉकेट तसेच चांदीसदृश्य ताट, ग्लास, वाट्या, पायपट्ट्या, कमरबंद, पूजेचे साहित्य आणि नाणी जप्त करण्यात आली. याशिवाय विवो कंपनीचा मोबाइल फोनही पोलिसांनी हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ३ लाख ९० हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील गोविंद उर्फ गोबा काशीराम साखरे (वय २२, रा. म्हाडा क्वार्टर, कपिलनगर) आणि दयाशंकर उर्फ सागर संतोष बघेल (रा. म्हाडा क्वार्टर, कपिलनगर, नागपूर) हे दोन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT