नागपूर : नागपूर शहरातील युनिट-३ पथकाने कारवाई करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील चार घरफोड्या आणि एका वाहन चोरीचा छडा लावला आहे. या कारवाईत चार प्रौढ आरोपींसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख ६३ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे पाच किलो चांदीचे दागिने व भांडी, चोरीचे मोबाइल, हेडफोन, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली आणि चोरीची वाहने यांचा समावेश आहे.
युनिट-३ पथकाने तपासाची चक्रे फिरवत भूषण उर्फ मोसा अशोक ठाकरे (वय २३, रा. नवाबपुरा, कोतवाली, नागपूर), गौरव सुरेश खडसे (वय २०, रा. नवाबपुरा, कोतवाली, नागपूर), क्रिश रामचरित्र जयस्वाल (वय १९, रा. संताजीनगर, कान्हान) आणि अमन बिसन देव सहानी (वय २३, रा. इंदर कॉलनी, टेकाडी) यांना तसेच दोन १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींकडून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आले. यामध्ये लकडगंज पोलिस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा, अजनी पोलिस ठाण्यातील वाहन चोरीचा गुन्हा, रामनगर (वर्धा) येथील गुन्हा, वर्धा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हा, आणि सेलू (वर्धा) येथील गुन्हा यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींकडून सुमारे पाच किलो चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी असा अंदाजे ११ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय चोरीचे मोबाइल व हेडफोन, २ हजार ८९० रुपयांची रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच ४९ सीपी १०६७) आणि रॉयल एनफिल्ड दुचाकी (एमएच ४९ सीके ६६१४) जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडील पाच मोबाइल फोनही ताब्यात घेतले असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १५ लाख ६३ हजार ८९० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वर्धा शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राम ढगे आणि त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.