Maharashtra forest department
नागपूर : नागपुरातील वन विभागाची मुख्य कार्यालये मुंबईला हलविण्याचा प्रस्ताव उघडकीस आला आहे. नागपूर करारप्रमाणे ही कार्यालये नागपुरातच असावयास हवी, मात्र सातत्याने नागपूर करारचा भंग केला जात आहे, याविरोधात विदर्भवाद्यांनी आंदोलन केले.
विदर्भातील जनतेने व वन विभागाने विदर्भात वनाचे संरक्षण व संवर्धन केले आहे. असे असतांना सुद्धा वनविभागाची कार्यालये विदर्भा बाहेर नेणे हा विदर्भातील जनतेवर घोर अन्याय आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीने मागील महिन्यात मुख्यमंत्री यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन दिले. विदर्भातील जनतेवर होणारा अन्याय दूर करावा अशी विनंती करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उगारण्याचा इशारा देण्यात आला होता.
यासोबतच हिवाळी अधिवेशन काळात याविषयावर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. परंतु महाराष्ट्र सरकारतर्फे कोणतेही उत्तर न मिळाल्याने विदर्भ राज्य आंदोलन समिती व्हेरायटी चौकात रस्त्यावर उतरली. मुख्य वन संरक्षकाचे कार्यालय नागपूर या उपराजधानीच्या ठिकाणाहून हलविल्यामुळे उपराजधानीचा दर्जा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असे म्हणावयास हरकत नाही असा आरोप करण्यात आला.
यामुळे विदर्भातील वनामध्ये अवैध वृक्षतोड होऊन वनांचा ऱ्हास होईल, वन उत्पादनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होईल. आज विदर्भातील अधिकारी व कर्मचारी वन संरक्षक कार्यालयात कार्यरत आहेत, त्यांना मुंबईला स्थलांतरीत व्हावे लागेल याकडे लक्ष वेधण्यात आले. वन विभागाचे मुख्यालय आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे ", "कुछ दे नही सकते तो छिनो मत" , तुमच्या भुजेत नाही बळ,आता विदर्भ सोडून पळ", "हम हमारा हक्क मांगते नही किसी से भीक मांगते", "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" , "लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे" यासारख्या घोषणा देण्यात आल्या.
माजी विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार यांनी वेळ पडली तर आम्ही जेलमध्ये जाऊ परंतु विदर्भातील वनविभागाचे मुख्य कार्यालय नागपुरातून हलवू देणार नाही. महाराष्ट्र सरकारने आमचा अंत पाहू नये असा इशारा दिला.
आंदोलनात युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष मुकेश मासुरकर, विदर्भ प्रचार प्रमुख तात्यासाहेब मत्ते, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, जनमंचचे माजी अध्यक्ष प्रमोद पांडे, अण्णाजी राजेधर, गुलाबराव धांडे, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, गणेश शर्मा, राजेंद्र सतई, निलिमाताई सेलूकर, बबिता नखाते, भोजराज सरोदे, अनिल केशरवाणी, भरत बाविस्टाले, माधुरी चौव्हाण, रत्नाकर जगताप, रजनी शुक्ला, विनिता भोयर, किरण बनारसे, तेजराम रेवतकर, गंगाधर मुंडकर, रामकृष्ण पौनिकर, संतोष खोडे, जॉय बांगडकर, सुमित तांदूळकर, राज यादव, संतोष खोडे, सतीश शेंद्रे, ज्योती मुदलीयार, पुष्पाताई गायधने, कल्पना धांडे, निकेलेश शेंडे, अमूल साकुरे, रामकुमार चौरसिया, प्यारू भाई उर्फ नौशाद हुसैन, महादेव गिरडकर आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.