नागपूर

Nagpur News : बंदी असलेल्या थाई मांगूरवर मत्स्य विभागाची धडक कारवाई

पारशिवनी तालुक्यातील ११ तलावांमधून ३६ टनांहून अधिक मासे नष्ट; तीन महिन्यांत ५१ टन थाई मांगूरवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : बंदी असलेल्या थाई मांगूर माशांची अवैध पैदास आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मत्स्य विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. पारशिवनी तालुक्यातील चिचोली-महादुला परिसरातील ११ तलावांवर कारवाई करत तब्बल ३६ टनांहून अधिक थाई मांगूर मासे जप्त करून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध मत्स्यपालन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध मत्स्यपालनाचा पर्दाफाश गुगल मॅपिंगद्वारे

संशयित तलावांची माहिती मिळवण्यासाठी मत्स्य विभागाने प्रथम गुगल मॅपिंगचा वापर केला. त्यानंतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वी डमी ग्राहकांच्या माध्यमातून थाई मांगूरची अवैध पैदास आणि विक्री होत असल्याची खात्री करण्यात आली. माहितीची पूर्ण खातरजमा झाल्यानंतर संबंधित तलावांवर छापे टाकण्यात आले.

साहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाच्या पथकाने स्थानिक २५ मच्छीमारांच्या मदतीने ही कारवाई पार पाडली. जाळ्यांच्या साहाय्याने ११ तलावांमधून ३६ टनांपेक्षा अधिक थाई मांगूर मासे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे सर्व मासे खोल खड्डे खोदून त्यात पुरून नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी अवैधरीत्या थाई मांगूरचे मत्स्यपालन केल्याच्या आरोपावरून शकील खान अब्दुल सलाम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे.

तीन महिन्यांत ५१ टन थाई मांगूर नष्ट

थाई मांगूरच्या अवैध मत्स्यपालनाविरोधातील ही कारवाई एका व्यापक मोहिमेचा भाग आहे. गेल्या तीन महिन्यांत नागपूर विभागात सुमारे ५१ टन बंदी असलेला थाई मांगूर नष्ट करण्यात आल्याचे मत्स्य विभागाने सांगितले. पारशिवनी तालुक्यात केलेली ही कारवाई अलीकडील काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. जिल्ह्यातील संशयित तलाव आणि अवैध मत्स्यपालन केंद्रांवर यापुढेही सातत्याने पाळत ठेवून कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT