नागपूर : नागपुरातील नरसाळा परिसरातील चाणक्यपुरम येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेले गडरलाईनचे शेकडो प्लास्टिक / सिंथेटिक पाईप भीषण आगीत भस्मसात झाले. चाणक्यपुरम व नरसाळा परिसरात गडरलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
त्यानिमित्ताने या परिसरातील पाण्याच्या मोठ्या टाकीजवळ हजारो पाईप ठेवले होते. आज रविवारी सकाळी 10 वाजता या पाईपच्या साठ्याला ही आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
चाणक्यपुरम येथील रहिवासी जितेंद्र मुळे यांनी फायरब्रिगेडला फोन करून या आगीबाबत माहिती दिली. तातडीने फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत शेकडो पाईप जळून खाक झाले. ही आग अजून मोठ्या प्रमाणात पसरली असती तर तिथे असलेले उर्वरित शेकडो पाईप आगीच्या स्वाधीन झाले असते. फायर ब्रिगेड व पोलिसांकडून तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविणे शक्य झाले. आजूबाजूला लागून घरे आहेत, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. मोकळ्या जागेत कचरा जाळल्यावरून ही आग पाईपपर्यंत पोहोचली, असा नागरिकांचा प्राथमिक अंदाज आहे.