नागपूर : नागपूर विभागातील शिक्षण विभागातील कोट्यवधींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील मोडस ऑपरेंडी कशी होती, हे आता हळूहळू बाहेर येत आहे. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह पाचही आरोपींना बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी पाच आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून याचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. २०१४ ते २०२४ या कालावधीत ३५ ते ४० लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून घेत बनावट कागदपत्रे, सोमेश्वर नैताम नामक सेवानिवृत्त आणि हयात नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरींचा नियुक्ती पत्रासाठी झालेला वापर लक्षात घेता आता सुमारे ५८० शिक्षकांच्या,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींवर टांगती तलवार आहे. राज्य सरकार, शिक्षण विभागाने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण करण्यात आली असून नियुक्तीपासून तर वेतन निश्चिती पथक, वेतन जमा करेपर्यंतचा सखोल तपास झाल्यास हा शेकडो कोट्यवधींचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात एसआयटी मार्फत चौकशी केली जावी, अशीही मागणी सुरू आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षक निलेश मेश्राम यानेच नियुक्तीसाठी आवश्यक बोगस कागदपत्रे तयार करून दिली असल्याने पोलिसांनी निलेश मेश्रामसह तिघांना अटक केली. यात शिक्षण उपनिरीक्षक संजय शंकरराव सुधाकर (वय ५३), लिपिक सुरज पुंजाराम नाईक (वय ४०) अशी इतर दोघांची नावे आहेत. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना यापूर्वीच गडचिरोली येथून अटक करण्यात आली. दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आली. यानंतर पुन्हा एक दिवसांची पोलिस कोठडीत वाढ झाली. पोलिसांनी उल्हास नरड यांच्या कार्यालयातून चौकशीत महत्वाची कागदपत्रे मिळविली असून आता यामध्ये इतर आणखी कोण सहभागी आहेत त्याचे धागेदोरे जुळविले जात आहेत. नीलेश मेश्राम याने बनावट नियुक्ती पत्रासाठी पराग पुडके यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे पुढे आले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू असून आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या कारवाईला वेग आल्याने आता शिक्षण विभागातील इतरही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.