नागपूर : “१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार” या नावाखाली सुरू असलेल्या एका संशयास्पद आणि बेकायदेशीर शिबिराचा आज भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीने भांडाफोड केला. यामुळे अनेक नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा मोठा धोका टळला आहे.
सोशल मीडियावर संबंधित व्यक्ती देशातील विविध राज्यांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत होती. नागपुरातील धरमपेठ येथील सुगंध सभागृह परिसरात या शिबिराचे आयोजन करून “१००% आयुर्वेदिक इलाज” अशा जाहिरातींद्वारे नागरिकांकडून मोठे शुल्क आकारले जात होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरचे अध्यक्ष डॉ. विनोदजी दाढे, डॉ. प्रणय चांदेकर, डॉ. अजय सारंगपुरे आणि राकेश कोंटमवार यांनी पुढाकार घेऊन ही माहिती प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुनील मित्रा, मनपा आरोग्य समितीचे उपसभापती श्रीकांत आगलावे व सभापती मनीषा अतकरे यांनी तात्काळ दखल घेत मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी व कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार मनपाचे आरोग्य अधिकारी आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
संयुक्त चौकशीदरम्यान या शिबिरासाठी कोणतीही आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. प्रशासनाने हे शिबिर तात्काळ बंद करून तेथील औषधे आणि इतर साहित्याचा साठा जप्त केला. कोणत्याही वैद्यकीय उपचारांबाबत खात्रीशीर शासकीय मान्यता, डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता व अधिकृत परवानगी तपासूनच उपचार घ्यावेत आणि असा संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीतर्फे यानिमित्ताने करण्यात आले आहे.